चिंब ओल्या पावसात
घेऊन हाती तुझा हात
चालावे वाटते
पुन्हा पुन्हा
बट बाजुला सारून
डोळ्यात तुझ्या डोळे भरून
पाहावे वाटते
पुन्हा पुन्हा
बहरले सुंदर वन
मद मोहक तुझे यौवन
न्याहाळावे वाटते
पुन्हा पुन्हा
इंद्रधनु मेघांत खट्याळ
गळ्यात तुझ्या मिठीची माळ
अर्पावी वाटते
पुन्हा पुन्हा
रम्य भासणारे भास
ओठी तुझ्या माझे श्वास
गुंफावे वाटते
पुन्हा पुन्हा
ऋतुचा ओला सण
सोबत तुझ्या माझे क्षण
सरावे वाटते
पुन्हा पुन्हा
प्रीतीची तु सर जणू
सरीत मनीचे अणु रेणू
भिजावे वाटते
पुन्हा पुन्हा