सगळ्या व्यक्ती सारख्या नसतात. स्वभाव, आचार-विचार, आवड-निवड, राहणी अशा अनेक बाबतीत एक व्यक्ती इतर व्यक्तींपेक्षा वेगळी असते. व्यक्ती-व्यक्तींमधील ही भिन्नता कमी जास्त प्रमाणात असते आणि ह्या भिन्नतेमध्येही साम्य शोधणे हा माणसाचा गुणधर्मच म्हणावा लागेल. माणसाला आपल्या स्वतः सारख्याच व्यक्ती सभोवताली असाव्यात असे वाटत असते. साम्य असणाऱ्या व्यक्ती सोबत राहायला तसं सोपं जातं कारण तडजोड करण्याचं प्रमाण कमी असतं.

पण आपल्या सोबत, सभोवताली नेहमी साम्य असणाऱ्याच व्यक्ती असतील अशी अपेक्षा ठेवणे कधीही चुकीचे. आपल्या सोबत वावरणारी माणसे स्वभावाने आणि विचाराने वेगळी असतात आणि त्यांच्यातलं हे वेगळेपण लक्षात घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा माणूस ह्या वेगळेपणाचं अस्तित्वच विसरून जातो मग ते इतरांच्या बाबतीतलं असो वा स्वतःच्या बाबतीतलं. आपल्याला जर व्यक्ती-व्यक्तींमध्ये असणारं हे वेगळेपण ओळखता आणि स्वीकारता आलं नाही तर त्रास होतो.

कधी कधी मात्र उलट घडते. आपल्याला स्वतः मधले स्वतःचेच वेगळेपण ओळखणे जमत नाही आणि जमले तरी ते स्वीकारणे थोडे अवघड वाटते. बहुतांशी लोकांना त्यांच्यातलं हे वेगळेपण शोधायला आणि स्वीकारायला मोठा कालावधी लागतो. सुरुवातीला आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत ही गोष्टच मनाला पटत नसते. आपल्या आजुबाजुला वावरणारी सर्व माणसे सारखी आहेत, सगळ्यांकडे समान गुण, कौशल्य आणि बुद्धिमत्ता आहे असे वाटते. सतत इतरांचा विचार करत असताना आपण इतरांसारखे का नाही असा प्रश्नही पडतो किंवा त्यापलीकडे आपण इतरांसारखे बनण्याचा प्रयत्नही करतो. जगात वावरण्यापासून ते विचार करण्यापर्यंत सर्व बाबतीत अनुकरण करण्याचा एक निरागस प्रयत्न चालू असतो. एका दिशेने जाणाऱ्या मोठ्या प्रवाहात शामिल होणे आणि त्या प्रवाहासोबत वाहत जाणे अनिवार्य असते असा न लिहिलेला नियम आपण पाळत असतो. पण मुळात आपल्यात असणारं वेगळेपण ह्या गोष्टी करताना आपल्या आड येत असतं. बऱ्याच गोष्टी आपल्या मनाला मान्य नसतात आणि मनाविरुद्ध जाणंही जमत नसतं. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत ही जाणीव सतत होत असते. काहींना ह्या वेगळेपणाचं दुःख होत असतं तर काहींना त्याचा आनंद वाटत असतो.

जशी एखादी व्यक्ती ही इतरांपेक्षा वेगळी असते तसा जगाकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टीकोनही वेगळा असतो. त्यामुळेच प्रत्येकाने आपल्यामधलं हे वेगळेपण लवकरात लवकर ओळखून जगायला सुरुवात केली पाहिजे. आपल्या वेगळेपणाचा अभिमान तर इतरांच्या वेगळेपणाचा आदर केला पाहिजे. आपल्यातलं वेगळेपण, वेगळे विचार आणि वेगळा दृष्टीकोन आपल्याला नवीन दिशेला नेणार असतो, एक नवीन वाट जी इतर प्रवाहांच्या उलट दिशेला जाणारीही असू शकते. मात्र, ही नवीन वाट वेगळी असली तरी ती आपली स्वतःची असते. ह्या वाटेवर वाटचाल करताना मिळणारा आनंद, समाधान आणि सुख काही वेगळंच असतं हे नक्की.

आपण निवडलेली एक नवीन छोटीशी वाट एका नवीन प्रवाहाची सुरुवातही असू शकते. इतरांच्या डोळ्यांनी आयुष्याकडे बघण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यांनी आयुष्याकडे बघितले पाहिजे. आयुष्य सुंदर आहे.

pratikakkawar
प्रतिक अक्कावार

शब्दांची भावना आणि विचारांशी सांगड घालून शाब्दिक कलाकृती निर्माण करणारा असाच एक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site is protected by reCAPTCHA and the Google Privacy Policy and Terms of Service apply.