तिला पावसात भिजताना पाहून मी बरेच काही मनात साठवतो
जेव्हा जेव्हा पडतो पाउस तेव्हा तेव्हा हेच दृश्य आठवतो
भेटण्यास आतुर तिला क्षणार्धात बदलणारा ऋतू
तिच्या नाजूक देहावर बरसण्याचा पावसाचा कपट हेतू
पावसाला शामिल सैरवैर वाहणारा बेधुंध गार वारा
खट्याळ वाऱ्याची साक्ष देणारा तिच्या अंगावरचा अलगद शहारा
डोक्यावर भरून आलेले आभाळ अन पाण्याने उन्मत झालेले ढग
पावसाची तिला लागलेली चाहूल अन आडोसा शोधण्यासाठी चाललेली तिची लगबग
बेताल कोसळणारी पावसाची संततधार अन लाजत बरसणारी कोमल सर
स्वतःला सावरण्यासाठी तिने कमरेत खोचलेला साडीचा भिजलेला पदर
अवेळी पावसाने उडालेली तिची धांदल अन नाकावर उमटलेली रागाची अस्पष्ट छाप
थंड हवेत विरणारे तिचे अस्वस्थ श्वास अन थंडीमुळे होणारा तिच्या ओठांचा थरकाप
पाण्याने चिंब भाजलेले तिचे काळेभोर केस अन माथ्यावर रेंगाळणारी एक ओली लट
तिच्या गुलाबी गालावरून ओघळून मुके घेण्याचा थेंबानी रचलेला कट
तिच्या नाजूक ओठांचा थेंबांना होणारा मादक स्पर्श
चुंबनाचा मनसोक्त आनंद लुटणाऱ्या थेंबांचा विलक्षण हर्ष
इंद्रधनू प्रमाणे उजळलेला तिचा गोरा रंग अन भिजलेलं सतेज सोज्वळ मुख
निखळ पाण्याने नखशिखांत न्हाहून निघालेलं तिचं सुंदर तेजस्वी रूप
हवेत दरवळणारा सुगंध अन तिच्या केसांमध्ये दिमाखात डोलणारा पांढरा शुभ्र गजरा
वेगवेगळे बहाणे करून तिचे भिजलेले सौंदर्य न्याहाळनाऱ्या हजारो चोरट्या नजरा
शब्दात न मांडता येणारा असा एक अद्भुत क्षण
ते मांडण्यासाठी आसुसलेले माझे शब्द अन अतृप्त मन