सांगू दे थोडं शब्दात, थोडं राहू दे अबोल
मनाला थोडा सावरू दे जुन्या आठवणींचा तोल
तुझं खट्याळ हसणं, माझं उगाच रुसणं
मनापसून आपलं एकमेकांसोबत असणं
थोडी चेष्टा, थोडा राग अन थोडीशी चिंता
कळत नकळत झालेला भावनांचा गुंता
एखाद दोन भेटी, अपूर्ण अर्धवट संवाद
एकमेकांच्या हाकेला न चुकता दिलेली साद
थोडं प्रेम, थोडी ओढ अन थोडासा दुरावा
मनात जपलेल्या आठवणी आपल्या मैत्रीचा पुरावा
देण्यासारखं काही नव्हतं म्हणून आठवणच देतोय
आठवण म्हणून तुझ्या आयुष्यातला एक क्षण नेतोय