खूप भीती वाटते ना? साहजिकच आहे, सगळ्यांनाच भीती वाटत असते. भीती वाटणे, घाबरणे हा माणसाचा गुणधर्मच आहे. आयुष्यात काहीही करण्याच्या आधी मनात भीती ही असतेच. माझ्या, तुमच्या आणि सगळ्यांच्याच मनात असते. कोणत्याच गोष्टीची, अगदी कसलीच भीती न वाटणारी व्यक्ती जगात सापडणे जवळपास अशक्यच. माणसाच्या ह्या स्वभावाला कोणीच अपवाद असू शकत नाही. आणि मुळात भीती वाटणे, घाबरणे ही वाईट गोष्ट असते अश्यातलाही काही भाग नाही. हे सगळे लोकांनी मनात रुजवून ठेवलेल्या काही धारणां प्रमाणे आहे. एखादी व्यक्ती घाबरते म्हणजे ती कमकुवत असते असा समाज सर्वमान्य झालेला दिसतो. पण सत्य जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीच्या जागी स्वत:ला ठेवून विचार केला पाहिजे याची जाणीव फार कमी जणांना असते.
प्रत्येक व्यक्ती ही इतरांपेक्षा वेगळी असते आणि त्या प्रमाणेच प्रत्येकाची भीतीही इतरांपेक्षा वेगळी असते. अगदीच समजाउन द्यायचं म्हंटल तर एखाद्या लहान निरागस मुलाची भीती ही एखाद्या वयस्क माणसाच्या भीती पेक्षा नक्कीच वेगळी असेल, नाही का? जशी लहान मुलाला गर्दीत चालण्याची , अनोळखी व्यक्तीशी बोलण्याची किंवा कोणी रागावण्याची भीती वाटू शकते तशीच एखाद्या वयस्क व्यक्तीला घेतलेले निर्णय चुकण्याची, एखादी संधी गमावण्याची किंवा अपयश येण्याची भीती वाटूच शकते. खरं तर प्रत्येक व्यक्ती काहीही नवीन गोष्ट करण्या आधी घाबरलेली असते. मनात सतत पुढे काय होणार आणि आपण केलेल्या कृतीचे परिणाम काय असतील असले विचार चालू असतात. काहीही करण्याआधी थोडा विचार करणे आणि परिणामांची थोडी फार शक्यता जाणून घेणे तसे योग्यच असते. कोणताही निर्णय घेण्या आधी वाटणारी भीती ही साहजिक आणि सर्व अर्थाने योग्य असते. अश्या प्रकारची भीती वाटणे गरजेचे ही असते.
पण कधी कधी ही भीती एवढी वाढते कि ती माणसाच्या मनात घर करून राहते आणि मग जन्म होतो तो एका भिताऱ्या व्यक्तीचा. काही लोक नेहमीच मनात भीती बाळगतात, अगदी घाबरून राहतात. एखादी नवीन गोष्ट करणे, नवीन आव्हान स्वीकारणे, काही जोखीम पत्करणे ह्या गोष्टींपासून अशी माणसे दूरच राहतात. अश्या याक्तीना मग सर्वच गोष्टी अशक्य वाटू लागतात. आणि मग अश्या व्यक्तींच्या भीतीपोटी आयुष्यातल्या बऱ्याच सुंदर गोष्टी अनुभवायच्या राहून जातात. कदाचित, त्यांना वाटणारी भीती ही योग्य ही असू शकते पण फक्त भीती वाटते म्हणून एखादी गोष्ट करण्याचे टाळणे हे कधीही अयोग्यच, नाही का? मला तरी वाटते, माणसाने भीती वर मत केली की जवळपास सगळ्याच गोष्टी सोप्या आणि सहज वाटू लागतात. फक्त तसे घडून येण्यासाठी लागते ते मनोधर्य, मनोशक्ती आणि साहस. या ठिकाणी मला काही गोष्टी नमूद कराव्या वाटत आहेत जिथे मनात भीती ठेवण्याची आणि घाबरण्याची नाही तर आपल्या भीती वर मात करून पुढे जाण्याची गरज आहे.
- नवीन आव्हान स्वीकारणे
- जबाबदारी स्वीकारणे
- अपयश हाती येणे
- अपेक्षाभंग होणे
- निंदा होणे आणि इतर..
वर नमूद केलेल्या आणि ह्या सारख्याच बाकी गोष्टींच्या बाबतीत मनातील भीतीमुळे खचून न जाता, आहे त्या परिस्थिती वर मात करून पुढे वाटचाल केली पाहिजे. पण कधी कधी मनात भीती असणे हे चांगले आणि योग्य असू शकते. उदाहरणार्थ,
- खोटे बोलणे
- चोरी करणे
- त्रास देणे आणि इतर..
थोडक्यात, मनात भीती बाळगणे हे चांगले की वाईट हे सभोवतालच्या परिस्थितीवर अवलंबून असते. पण अगदी संक्षेपात सांगायचे झाले तर ज्या गोष्टींचा परिणाम हा चांगला होणार हे माहित असते अश्या गोष्टी करताना मनातील भीती बाजूला ठेवावी आणि येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाऊन यश मिळावावे आणि ज्या गोष्टींचा परिणाम वाईट होणार असे वाटते तेव्हा मनातील भीतीला थोडा दुजोरा देऊन, नीट विचार करून पाऊल उचलावे. आयुष्य सुंदर आहे आणि अश्या सुंदर आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा निर्धास्तपणे आस्वाद घ्यायला हवा.