एकदा एक भावना शब्दांत अडकली

एकदा एक भावना शब्दांत अडकली
नकळत एका मनाच्या दारावर धडकली

खूप वाट पहिली पण दार नाही उघडलं
निराश होऊन परतताना स्वास्थ्य मात्र बिघडलं

शब्दावाटे मनाकडे रोजचा प्रवास सुरु झाला
प्रत्येक वेळी पदराशी मात्र वाईटच अनुभव आला

रोजची कसरत, रोजची धावपळ, रोजची असायची घाई
ज्या मनासाठी चाललं होतं सारं त्याला कळतच नव्हतं काही

रोज दाराशी वाट पाहणं आता भावनेला असह्य झाल होतं
दारापलीकडे जाण्याचं कुतूहल कधीच विरून गेलं होतं

काही केल्या थांबत नव्हता भावनेचा हा प्रवास
तिने पलीकडच्या मनात जावं एवढीच तिच्याकडून आस

तिला शब्दांत अडकवणाऱ्या मनालाही काहीच कळत नव्हतं
रोज शब्दांसोबत जाणाऱ्या भावनेशी त्याचही जुळत नव्हतं

नंतर त्यानं भावनेला पाठवणंच सोडलं
भावनेचं शब्दांशी असलेलं नातंच  तोडलं

आता नुसताच सुरु होता कोरड्या शब्दांचा प्रवास
समोरच्या मनाला मात्र आता होत होते भास

शब्दांसोबत येणाऱ्या भावनेची ते आता वाट पाहत बसायचं
भावनेला आत घेण्यासाठी त्याचं दार दिवस रात्र उघडं असायचं

एक दिवस पुन्हा शब्दावाटे भावना त्याच मनाच्या दारावर आली
तिच्यासाठीच खुल्या असलेल्या दारातून सरळ पलीकडच्या मनात गेली

पलीकडच्या मनाला शेवटी मात्र एक कळून चुकलं
दार बंद ठेवल्यानेच भावनेचं स्वागत करायचं हुकलं

पलीकडच्या मनाला अखेर ह्या मनाच्या अवस्थेची जाणीव झाली
मग त्याच्या शब्दावाटे तीच भावना ह्या मनाच्या दिशेने  निघाली

pratikakkawar
प्रतिक अक्कावार

शब्दांची भावना आणि विचारांशी सांगड घालून शाब्दिक कलाकृती निर्माण करणारा असाच एक.