आयुष्य ! तसं पाहिलं तर आयुष्य हा एक प्रवासच असतो. प्रत्येक व्यक्तीला तो करावाच लागतो. अगदी लहानपणा पासूनच हा प्रवास सुरु झालेला असतो आणि आपण तो करतही असतो अगदी स्वतःच्या नकळत. येणाऱ्या प्रत्येक दिवसा बरोबर ह्या प्रवासात वेगवेगळी वळणे येत असतात. पण ह्या प्रवासाची खरी गम्मत म्हणजे प्रत्येकाचा प्रवास हा अगदी भिन्न असतो. काहींसाठी हा प्रवास खडतर तर काहींसाठी खूप मजेशीर असतो. काहींना ह्या प्रवासाचा हेवा वाटतो तर काहींना तो नकोसा वाटतो. पण खरी मजा तेव्हा येते जेव्हा ह्या प्रवासात नवीन वाटा येतात, अनोळखी वाटा एकत्र होतात, नवीन व्यक्ती येतात आणि एकाच वाटेने प्रवास करत आपल्याला सोबत देतात. हा प्रवास करताना माणसाला खूप काही शिकायला मिळते, नवीन नवीन गोष्टींची अनुभूती होते आणि असच आयुष्याचा एक एक टप्पा गाठत माणूस आयुष्यात पुढे पुढे जात असतो.
काहीजण हा प्रवास करायचा म्हणून करतात तर काहीजण ह्या प्रवासाचा मनापासून आनंद घेत असतात. टप्प्याटप्प्याने काळा सोबत पुढे सरसावणारा हा प्रवास कधी वेग पकडतो कळतच नाही. पापण्यांची उघड-झाप झाली आणि त्या एका क्षणात पूर्ण आयुष्य सरले असे वाटायला लागते. मग असे वाटते आपण ह्या संपूर्ण प्रवासात जगायचेच विसरलो. खूप इच्छा, आकांक्षा अपूर्ण राहिलेल्या असतात. खूप प्रश्नांची उत्तरं मिळायची बाकी असतात, खूप साऱ्या गोष्टी गुपित बनून राहतात. मग थोड्या वेळात खूप जगावं वाटत. अगदी काळाचं चक्र उलट फिरवून मागे परतावे वाटते आणि पुन्हा जगावे वाटते. अर्थातच प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर आल्यावर ते अशक्य असत.
पण एक गोष्ट शक्य आहे, आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर असताना येणारा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचे ठरवले कि आयुष्य हे नक्कीच सुंदर वाटतं. आयुष्याकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता त्यातील प्रत्येक सुंदर गोष्टींचा आस्वाद घेत जगलं कि आयुष्य हे खूप सुंदर बनतं.